सईबाई शिवाजी भोसले – Saibai Shivaji Bhosale

सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा या पर्व मध्ये आज दुसरा दिवस ह्या नवरात्री च्या दुसऱ्या दिवशी आपण आज सईबाई शिवाजी भोसले यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत.

मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. या स्त्रियांनी कधी प्रत्यक्ष तर कधी पडद्यामागे राहून आपली तेजस्वी प्रतिमा राज्यकारभारत उमटवली.

एक पावन पणती जिने छत्रपती शिवरायंच्या आयुष्यात असंख्य सुखाचे दीप उजवले..

एक हवेची सुखद झुळूक जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले..!!

सईबाई शिवाजी भोसले

युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी, महापराक्रमी परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून. निंबाळकर घराण्याची लेक सौभाग्यकांक्षीणी, स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई.

शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते. तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेब यांच्या त्यागाकडे जाते. सईबाई राणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी, गृहिणी, सचिव होत्या. सईबाई राणीसाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना एकोणीस वर्षे अत्यंत समर्थपणे साथ दिली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणीसाहेब यांच्याबरोबर झाले होते. लग्नात राजे १० वर्षांचे, तर सईबाई राणीसाहेब ७ वर्षांच्या होत्या.

सईबाई राणीसाहेब या अत्यंत शांत, सोशिक व सामर्थ्यवान होत्या. त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे व माहेरच्या संस्कारामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात व जिजाऊसाहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात समर्थ बनल्या होत्या. आपल्या माहेरच्या चांगल्या संस्कारामुळे त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राजकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने पाहून, स्वराज्याविषयीच्या कर्तृत्वाने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते. स्वराज्याविषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबर सईबाई राणीसाहेबांनी तितक्याच समर्थपणे पार पाडले होते.

हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या हर एक प्रसंगात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने होत्या.

शिलेदारीचे व्रत पत्करलेले राजे स्वराज्य संस्थापक म्हणून मानाने मिरवत होते. दौलतीच्या विस्तारासाठी मुलूखगिरी करून मोहिमा राबवत होते. मोहिमा जिंकून, यश मिळवत असताना सारे बंध, सारे पाश तोडून टाकल्यासारखे राजे फक्त आणि फक्त स्वराज्यासाठीच झटत होते. तळहातावर प्राण घेऊन काफर यवनावर तुटून पडत होते. राजकारणातील चढ-उतार गुंते सोडवताना कधीकधी स्वतःलाही विसरत होते. स्वराज्यासाठी आपल्या मुलखापासून दूर दूर जात होते; पण अश्या वेळी स्वराज्यचा दप्तरी कारभार नायनिवाडे सईबाई राणीसाहेब राजमाता जिजाऊ च्या सोबतीने पहात होत्या.

१६५७ साली किल्ले पुरंदर येथे सईबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला. संभाजी महाराज्यांव्यतिरिक्त सईबाईंना तीन कन्यारत्नेही होती ज्यांची नावे सखुबाई (सकवारबाई), राणूबाई व अंबिकाबाई अशी होती.

विवाहानंतर एकोणीस वर्षे सईबाईंनी शिवाजी महाराजांना साथ दिली. या एकोणीस वर्षांच्या काळात सईबाई यांचा स्वभाव तसेच शिवाजी महाराज व सईबाई यांचे नाते कसे होते हे जाणून घेण्यास दोघांच्या जीवनातील एक प्रसंग खूप महत्वाचा आहे.  स्वराज्य निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळी शिवाजी महाराजांनी तोरणा, राजगड, सिंहगड, चाकण हे किल्ले ताब्यात घेऊन राजगडावर इमारतींचे काम सुरु केले. ही बातमी अदिलशहापर्यंत गेल्यावर त्याने शिवाजी महाराजांना “तुम्ही पातशाही चाकर असून मुलुख मारता, किल्ले घेता, खजिना लुटता हे उत्तम करीत नाही. बरे झाले ते माफ असे. तुम्ही हुजूर येणे, तुम्हास दौलत देऊ, सरफराज करू” असा संदेश पाठवला. आदिलशहाकडून संदेश आल्यावर शिवाजी महाराजांनी हा संदेश सईबाईंना सांगितला व विचारले की, “पातशाहाने कौल पाठवून भेटीस  बोलावले आहे, जावे की न जावे?” यावर सईबाई महाराजांना म्हणाल्या “आम्हा स्त्रियांस पुसावे असे नाही, महाराज काय समजोन पुसतात न कळे, थोर थोर लोक मुसद्दी आहेत, ज्यांचा भरवसा असेल त्यांस विचार पुसावा.” यावर महाराज म्हणाले की “बरोबर आहे मात्र स्त्रियास्त्रियांत अंतर आहे. माता ही घराचे दैवत तर स्त्री म्हणजे घरचा प्रधान याजकरिता विचारले” यानंतर सईबाई म्हणाल्या की “महाराजांचे वडील हुजूर आहेत, महाराजांनी पातशाही किल्ले घेतले, मुलुख मारिला याकरिता हुजूर जावे हा सल्ला नाही, वडिलांवर दृष्टी ठेवून जाल तर बरे कसे दिसेल? राज्य करावे असेल तर श्री शंकरजींस शरण जावे. श्री जे कार्य नेमून देतील ते पाहावे. राज्य करणे त्यास मोह कैसा? कंबरेस दाली बांधावी (तलवार लावण्याचा कमरपट्टा बांधून लढण्याची तयारी करावी). पुढे जे होणे ते होईल.” सईबाईंचा हा धीरोदात्त सल्ला ऐकून शिवरायांना अतिशय आनंद झाला आणि शिवरायांना शहाजीराजांनी कर्नाटकातून पोवळ्याचा पलंग, चार लाख होनांचा सोन्याचा कमरपट्टा, जिऱ्हे बखतरे, टोप आणि फिरंग तलवार अशा मौल्यवान वस्तू जलमार्गाने पाठवल्या होत्या त्यापैकी सोन्याचा कमरपट्टा सईबाईंना भेट म्हणून दिला आणि सईबाईंच्या सल्ल्यानुसार कमरबंदी (लढण्याची तयारी) केली. शिवचरित्रातील या एका प्रसंगातून महाराणी सईबाईंचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या नजरेसमोर उभे राहते.

सईबाईराणीसाहेब जास्त काळ जगल्या असत्या, तर कदाचित संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहासच बदलला असता.

राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षांचे शंभूराजे आईविना पोरके झाले. वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी सईबाई राणीसाहेब हे जग सोडून निघून गेल्या; पण जाताना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला एक छावा अर्पण केला. या छाव्याने पुढे रुद्रावतार धारण करून मोगलाबरोबर इतर शत्रुना नाकी नऊ आणले.

०५/०९/१६५९ रोजी सईबाईंचे दीर्घ आजाराने राजगडावर निधन झाले. निधनसमयी सईबाई यांचे वय २६ वर्षे होते. महाराजांना स्वराज्यकार्यासाठी प्रेरित करणाऱ्या राजमाता जिजाबाई होत्या तर या कार्यात त्यांना साथ देणाऱ्या महाराणी सईबाई होत्या व यामुळेच शिवाजी महाराजांना स्वतःस निर्धास्तपणे स्वराज्यकार्यात पूर्णपणे झोकून देणे शक्य झाले.

                                                                                                                                !! माहिती In मराठीकडून महाराणी सईबाई यांना मनाचा मुजरा !!

 

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved
Privacy Policy | Disclaimer